निमित्त राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढपूरमध्ये दाखल होतात. महिनाभर पायी वारी करून त्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. यंदाची आषाढी एकादशी एकदम तोंडावर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि दिंड्या साठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला याबाबत सूचना दिल्या आहेत. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे आषाडी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी 1500 दिंड्यांना तीन कोटी रुपयांचा अनुदान वाटप झाले होते. अगदी तशाच पद्धतीने यंदाही वारकऱ्यांना दिंडी (Ashadhi Wari 2025) अनुदान दिले जाईल. मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान सरकार कडून वितरित होणार आहे. शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले हे देखील गेल्या काही दिवसांपासून दिंडी अनुदानासाठी प्रयत्नशील होते. यानंतर आता भोसले महाराजांना एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम- Ashadhi Wari 2025
दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमधील सहभागी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे.