मुकेश अंबानी यांची नवीन योजना, FMCG उद्योग वेगळा करुन IPO आणणार?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या व्यवसायाला चालना देण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीकडून त्यांचे सर्व एफएमसीजी ब्रँड्स एका नवीन कंपनीत विलीन करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याचा उद्देश या उत्पादनांवर विशेष लक्ष देणे आहे. तसेच फक्त एफएमसीजी क्षेत्रात आवड असलेल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करणेही आहे. त्यासाठी नवीन आयपीओ आणण्यात येणार आहे.

 

जिओप्रमाणेच थेट रिलायन्स अंतर्गत…

सध्या रिलायन्सची एफएमसीजी उत्पादने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड, रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड अंतर्गत आहेत. परंतु आता मुकेश अंबानी एक नवीन कंपनी बनवणार आहे. एफएमसीजी उत्पादन असणाऱ्या नवीन कंपनीचे नाव न्यू रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (नवीन आरसीपीएल) असणार आहे. ही कंपनी जिओप्रमाणेच थेट रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत काम करणार आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एमएमसीजीला वेगळे करण्याची योजना तयार केली आहे. या योजनेला 25 जून रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने मंजुरी दिली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे पाऊल आहे. एनसीएलटीने म्हटले आहे की, ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे कंज्यूमर ब्रांड्सचा व्यवसाय खूप मोठा आहे. त्यात प्रॉडक्ट बनवण्यापासून ते बाजारात आणण्यापर्यंतचे काम असते. हा व्यवसाय रिटले उद्योगापासून वेगळा असतो. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या एक्सपर्टीजची गरज असते.

 

रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे मूल्य १०० अब्ज डॉलर

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आधीच सांगितले आहे की, कंपनी त्यांच्या किरकोळ आणि दूरसंचार व्यवसायासाठी शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स विकण्याची (आयपीओ) योजना आखत आहे. या बदलामुळे रिटेल उद्योगाची प्रगती वेगाने होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे व्यवसायाचे मूल्यांकन योग्य पद्धतीने होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होणार आहे. रिलायन्सच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे मूल्य १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जर हा आयपीओ आला तर तो अलिकडच्या काळात शेअर बाजारातील सर्वात मोठा सार्वजनिक आयपीओ असू शकतो. एफएमसीजी व्यवसाय किरकोळ व्यवसायापेक्षा वेगळा आहे, म्हणून तो रिलायन्सच्या वेगळ्या उपकंपनीमध्ये ठेवला जाणार आहे.