लाडक्या बहिणींच्या आनंदावर संक्रांत? हप्त्याला ब्रेक? मोठी अपडेट काय?

लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 14 आणि 15 जानेवारी रोजी 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान असल्याने या हप्त्याला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठीच मकर संक्रांतीचं निमित्त करुन हा हप्ता वितरीत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने याविषयी आक्षेप घेणारे पत्र ही राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. आता या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

लाडक्या बहि‍णींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानुसार 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत या मोठ्या सणाचे निमित्त पुढे करण्यात आले होते. पण 15 जानेवारी राज्यातील महापालिकांसाठी मतदान होत आहे. सध्या आचारसंहिता असल्याने लोकानुनय करणारे निर्णय घेता येणार नाही असा आक्षेप काँग्रेसने घेतला. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला. महापालिकेची निवडणूक झाल्यावर लाडकी बहीण योजनेचा निधी वितरीत करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने याविषयीचे पत्र ही निवडणूक आयोगाला पाठवले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याविषयीचे पत्र पाठवले आहे.

 

लाडक्या बहिणीवरुन राजकारण पेटले

 

काँग्रेसने हे पत्र पाठवताच भाजपने त्यावर टीका कली आहे. काँग्रेस लाडकी बहि‍णींचा द्वेष करत असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या योजनेविषयीचा काँग्रेसचा राग वारंवार उफाळून आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. महायुती सरकारने जेव्हा ही योजना आणली, तेव्हा या योजनेविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर हायकोर्टात गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहि‍णींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे. ही रक्कम लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा करून नये म्हणून काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याला विरोध नाही, तर निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केले आहे. महापालिका निवडणुकीनंतर हा हप्ता देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.