नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने उद्या, ६ फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेतला जाणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची थेट नियुक्ती केली जाणार आहे.
खासगी क्षेत्रात अनेक पदे रिक्त असतात. विविध कंपन्यांना त्या रिक्त पदांवर पात्र उमेदवार मिळत नाहीत. दुसरीकडे सुशिक्षित उमेदवार नोकरीच्या शोधात असतात. यामध्ये दोघांचीही भेट घालवून नोकरी मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात तीन नामांकित कंपनीद्वारे एकूण ८५ पदांची भरती केली जाणार आहे.
यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या करावा. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २ रा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्तांनी केले. या मेळाव्यातून अनेक बेरोजगार उमेदवारांना खासगी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
ऑनलाईन सहभागासाठी प्रक्रिया
http://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. Employment या टॅबवर क्लिक करा. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास येईल त्यासमोर असलेल्या Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल.
तदनंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा मॅसेज दिसेल अशा रीतीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवू शकता.