केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मोदी सरकारने या योजनेअंतर्गत २२ वा हप्ता शेतकऱ्यांना पाठवला आहे. या योजनेअंतर्गत ९.३२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८६४० कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या गुवाहटी येथून एका क्लिकवर योजनेचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला आहे. सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
शेतकरी योजनेच्या २२ व्या हप्त्याची वाट पाहत होते. या शेतकऱ्यांना हप्त्याविषयी कोणताही मेसेज आला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर आज अनेक शेतकऱ्यांना २००० रुपये खात्यात जमा झाले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचे २००० रुपये जमा झाले नाहीत.
ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण न करणे, शेतकरी ओळखपत्र तयार न करणे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे जमा न करणे यामुळे खात्यात हप्ता जमा झाला नसावा. तसेच बँक खाते आधार कार्डाशी लिंक केले नसल्यास हप्ता मिळत नाही. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ४ लाख कोटी रुपयाची रक्कम ट्रान्सफर केली आहे.आसामच्या शेतकऱ्यांनाही योजनेचा फायदा मिळत आहे. आसाममधील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ८००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, ९ कोटी ३२ लाख २५ हजार ९१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ वा हप्त्याची रक्कम पाठवण्यात आली आहे.