10 वी पास तरुणांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये परीक्षा न देता व्हा भरती, कुठे आणि कसा करायचा अर्ज?

भारतीय रेल्वेमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून येत्या २०२५-२६ या वर्षासाठी १९२ ॲप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नसून उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे.

 

रिक्त पदांचा तपशील आणि ट्रेड

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १९२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये विविध तांत्रिक ट्रेडचा समावेश आहे. यात फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि सीएनसी प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर यांसारख्या विभागांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही पदे प्रामुख्याने तांत्रिक कामाशी संबंधित असून रेल्वेच्या चाक निर्मिती युनिटमध्ये काम करण्याचा अनुभव याद्वारे मिळेल.

 

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १०वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेचा विचार केल्यास, १ मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे असावे.

 

सरकारी नियमांनुसार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना वयात ५ वर्षांची सूट, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरतीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यामध्ये कोणतीही मुलाखत किंवा लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांच्या १०वी आणि ITI मधील गुणांच्या टक्केवारीवर आधारित एक गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.

 

पगार किती मिळणार?

यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १०,८९९ ते १२,२६१ दरम्यान मासिक विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना रेल्वेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळेल, जे भविष्यात रेल्वेच्या कायमस्वरूपी भरतीमध्ये अत्यंत फायदेशीर ठरेल. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करून तो अचूक भरावा.

 

सामान्य आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹१०० अर्ज शुल्क आहे, तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. वरिष्ठ कार्मिक अधिकारी-II, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बेंगळुरू – ५६००६४, या ठिकाणी अर्ज पाठवावा लागेल. यासाठी अर्जाची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ अशी आहे.