तरुणांसाठी मोठी संधी! प्रशासनात काम करण्याची सुवर्णसंधी; दरमहा ६१,५०० मानधन, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘मुख्यमंत्री फेलोशिप २०२६’ अंतर्गत राज्यातील तरुणांना प्रशासनात थेट काम करण्याची संधी मिळमार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात ६० जागांसाठी भरती होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना मंत्रालय आणि जिल्हास्तरावर कामाचा अनुभव मिळेल.

 

राज्यातील तरुणांना प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी ‘मुख्यमंत्री फेलोशिप २०२६’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश उच्चशिक्षित आणि कल्पक तरुणांना शासनाच्या कामकाजात थेट सहभागी करून घेणे हा आहे. यामुळे धोरणनिर्मिती आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा जवळून अनुभव घेण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.

 

या फेलोशिपअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मंत्रालय तसेच जिल्हास्तरावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रशासनात नवीन विचार, ऊर्जा आणि आधुनिक दृष्टिकोन आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. तरुणांना प्रत्यक्ष काम करताना शासनाच्या विविध यंत्रणांशी समन्वय साधण्याचा अनुभवही मिळेल. या कार्यक्रमासाठी एकूण ६० जागा उपलब्ध असून, त्यामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही भरती प्रक्रिया स्पर्धात्मक असून, गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फेलोशिपमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (Indian Institute of Technology Bombay) च्या सहकार्याने ‘सार्वजनिक धोरण’ विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधीही मिळणार आहे. त्यामुळे केवळ कामाचा अनुभवच नव्हे, तर शैक्षणिक प्रगतीची संधीही उपलब्ध होईल.

 

या प्रक्रियेत निवड झालेल्या तरुणांना दरमहा ६१,५०० रुपये इतके मानधन दिले जाणार असून, त्यांना राजपत्रित गट-अ अधिकाऱ्याचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे या फेलोशिपचे आकर्षण अधिक वाढले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट ‘mahades.maharashtra.gov.in’ वर ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. एक वर्षाच्या कालावधीत या उपक्रमातून तरुणांना प्रशासनातील विविध पैलूंचा सखोल अनुभव मिळेल. भविष्यात सक्षम, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.