देशातील अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (सीआरपीएफ) मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली असून एकूण ९,१९५ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या भरतीसाठी किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरणार असल्याने ग्रामीण व शहरी भागातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॉन्स्टेबल (तांत्रिक व ट्रेड्समन) या पदांअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये ड्रायव्हर, मोटार मेकॅनिक, कुक, वॉटर कॅरिअर, वेल्डर, सुतार, शिंपी, न्हावी, धोबी तसेच सफाई कर्मचारी अशा विविध पदांचा समावेश आहे. विविध कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती संधी खुली करण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली असून, २० एप्रिलपासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी rect.crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा. आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची अंतिम सबमिशन करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया अशी पार पडेल
उपलब्ध पदांपैकी ९,०९६ पदे पुरुष उमेदवारांसाठी, ७९ पदे महिला उमेदवारांसाठी तर २० पदे पायनियर विंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. महिला उमेदवारांसाठी या भरतीत मर्यादित प्रमाणात संधी देण्यात आली आहे. पात्रतेनुसार उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
काही तांत्रिक पदांसाठी संबंधित ट्रेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र किंवा अनुभवाची अट लागू शकते. चालक पदासाठी २१ ते २७ वर्षे तसेच इतर पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली असून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांत पार पडणार असून त्यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कौशल्य चाचणी (लागू असल्यास), वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल.
भरतीसाठी ही तयारी आवश्यक
उमेदवारांनी प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्रपणे तयारी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भरती प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी उमेदवारांनी नियमित अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्तीवर भर देणे गरजेचे आहे. सामान्य ज्ञान, गणित आणि तर्कशक्ती या विषयांवर प्रभुत्व मिळवणे तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे उपयुक्त ठरेल.
सीआरपीएफमध्ये नोकरी मिळवणे म्हणजे केवळ रोजगार नव्हे, तर देशसेवेची एक मोठी संधी मानली जाते. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा आणि या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.