आषाढी वारीसाठी सर्वोत्तम सुविआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासह विविध संतांच्या पालख्यांसाठी वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे आषाढी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची आणि सुविधांची जबाबदारी प्रशासनाने प्रभावीपणे पार पाडली पाहिजे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या अडचणी व सूचनांवर आवश्यक कार्यवाही केली जाईल.