कर्जमुक्ती योजना; पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर ‘अपलोड’ करणे सुरु

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

 

तर काही जिल्ह्यातील कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी २ लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसून संबंधित बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्यांची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे.

 

ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

 

यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार ४०९ खात्यांची माहिती अपलोड

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळावा, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात २९ हजार ४०९ खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे.

 

या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांहून अधिक थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ योजनेची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.