राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! ‘या’ दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

राज्यातील १५ हजार १५५ ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे शक्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

वर्ष २०२४ ते २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील एकत्रित ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने जूनमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

 

दरम्यान, एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून तयार होणाऱ्या मतदार यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर या निवडणुका घेण्याची मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती; परंतु आयोगाने वेळेत निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रभागनिहाय मतदार यादीसाठी १५ एप्रिल २०२६ रोजीच्या विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरण्याचे सूचित केले आहे.

 

विशेषतः प्रभागनिहाय यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर आठ-पंधरा दिवसांत निवडणुकांचा बिगुल वाजतो, हा आजपर्यंतचा प्रशासनाचा अनुभव आहे; परंतु पावसाचे प्रमाण पाहून या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यताही आहे.

 

दृष्टिक्षेपात मतदार यादी कार्यक्रम

 

मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : १५ एप्रिल

 

प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध : २४ जुलै

 

हरकती व सूचना दाखलची मुदत : २९ जुलै

 

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ ऑगस्ट

संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार होणार

 

यादीत नावे कमी करणे, वाढविणे, वगळणे, दुरुस्ती होणार नाही

 

ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल, पं. स., तहसीलमध्‍ये यादी प्रसिद्ध होणार