आंध्र प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही तब्बल तीन वर्षांनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या १० दिवसांत पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मात्र, दिलासादायक बाब म्हणजे ही लक्षणे अत्यंत सौम्य असून, सध्या तरी कोणत्याही नव्या लाटेचे संकेत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
वर्षभरात ४८ रुग्णांची नोंद; मृत्यू शून्य
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात या वर्षात आतापर्यंत ४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद नाही. गेल्या तीन वर्षांपासून नियंत्रणात असलेला हा विषाणू २०२६ च्या सुरुवातीपासून हळूहळू पसरत असल्याचे समोर आले आहे. जानेवारीत ३, फेब्रुवारीत १, जूनमध्ये ११ तर एकट्या जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २१ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, नेहमीच्या कोरोना चाचण्यांपेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर आजारांच्या निदानासाठी किंवा शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या चाचण्यांमध्ये हे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.
कोरोना आता ‘इन्फ्लूएंझा’सारखा सामान्य; तज्ज्ञांचे मत
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इन्फ्लूएंझाप्रमाणेच कोविडही आता कायम राहणार आहे. या विषाणूंमध्ये काळानुसार बदल होत असतात, ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होताच दर एक-दोन वर्षांनी रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होते. जहांगीर हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. पीयूष चौधरी यांनी ‘टाईम्स ऑफ इंडियाला’ सांगितले की, “गेल्या ८ ते १० दिवसांत कोरोना आणि इन्फ्लूएंझा या दोन्हीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आमच्या रुग्णालयात ७ ते ८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. जर एका केंद्रात ही संख्या असेल, तर संपूर्ण शहरात अनेक रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, हा संसर्ग ओमिक्रॉनपेक्षाही सौम्य असून रुग्णांना खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि थकवा अशी ३ ते ५ दिवस राहणारी लक्षणे जाणवत आहेत. सौम्य लक्षणांमुळे अनेक जण चाचण्या करत नसल्याने प्रत्यक्ष संख्या यापेक्षा जास्त असू शकते.”