चामुंडा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तनू श्रीवास्तव असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. दर्शनानंतर तिनं चाऊमीन, आईस्क्रीम आणि शीतपेयावर ताव मारला होता.
त्यानंतर तिला उलटी झाली. मग तिची शुद्ध हरपली. कासगंजच्या खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. श्वसन नलिकेत चाऊमीन अडकल्यानं तनूचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली. तनूच्या आकस्मिक मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
मिरहचीच्या मारहरा रोड परिसरात राहणारे शरद श्रीवास्तव नोएडातील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे थोरली लेक भावना ऊर्फ तनू एंजल द फ्यूचर स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत होती. तर धाकटी लेक मनू इयत्ता चौथीत आहे. सर्वात लहान मुलगा ३ वर्षांचा आहे. तनूनं नवरात्रीत नऊ दिवसांचा उपवास केल्याचं तिची आई कल्पना यांनी सांगितलं. सोमवारी नवमीच्या पुजेनंतर तनूनं उपवास सोडला.
दुपारी १ वाजता आई, तीन मुलं आणि त्यांची आत्या कासगंज येथील चामुंडा मंदिरात दर्शनाला गेले होते. दर्शन घेतल्यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास तनूनं सगळ्यांसोबत आधी आईस्क्रीम आणि मग चाऊमीन खाल्लं. चार वाजता सगळे कासगंज बस स्थानकात पोहोचले. मग त्यांनी मिरहचीसाठी रिक्षा पकडली. इथे तनू शीतपेय प्यायली.
नदरई परिसरात रिक्षा पोहोचल्यावर तनूला उलटी झाली. काही वेळानंतर ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तनूची आई आणि आत्या घाबरल्या. जवळपास अर्ध्या तासानंतर सगळे मिरहचीला पोहोचले. तिथल्या डॉक्टरांनी तनूला तपासलं. तिची प्रकृती ढासळत चालल्यानं डॉक्टरांनी कासगंजला जाण्याचा सल्ला दिला.
यानंतर आई, आत्या, चुलत भाऊ आणि अन्य नातेवाईक तनूला घेऊन कासगंजला गेले. इथल्या एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. आईच्या डोळ्यांदेखत तनूनं तडफडून जीव सोडला. संध्याकाळी सातच्या सुमारास आई आणि नातेवाईक तनूचं शव घेऊन गावी परतले. सकाळी देवदर्शनाला गेलेली तनू संध्याकाळी मृतावस्थेत परतल्याचं पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. गावावर शोककळा पसरली.