हरियाणामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आणि शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. हरियाणा लोक सेवा आयोगाने HPSC पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT कॉम्प्युटर सायन्स या पदांसाठी तब्बल १६७२ जागांची भरती जाहीर केली आहे.
हरियाणामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आणि शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. हरियाणा लोक सेवा आयोगाने HPSC पोस्ट ग्रॅज्युएट टीचर PGT कॉम्प्युटर सायन्स या पदांसाठी तब्बल १६७२ जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विषयाचे शिक्षक नियुक्त केले जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ९ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट hpsc.gov.in ला भेट द्यावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. उमेदवाराने M.Sc कॉम्प्युटर सायन्स, MCA किंवा BE/B.Tech कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आयटी पदवी घेतलेली असावी. या पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने १०+२, पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर हिंदी किंवा संस्कृत विषयाचा अभ्यास केलेला असावा. तसेच हरियाणा शिक्षक पात्रता परीक्षा HTET किंवा STET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादेबाबत सांगायचे झाले तर अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४२ वर्षे असावे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. अर्ज शुल्कही प्रवर्गानुसार वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये शुल्क आहे. आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार आणि माजी सैनिकांच्या आश्रितांसाठी DESM २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हरियाणातील दिव्यांग PWBD उमेदवारांना अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. सर्वप्रथम स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा होईल, ज्यामध्ये उमेदवारांच्या विषयज्ञानाची सखोल तपासणी केली जाईल. शेवटी मुलाखत होईल. या तिन्ही टप्प्यांमधील गुणांच्या आधारे अंतिम मेरिट यादी तयार केली जाईल आणि पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४७,६०० रुपये ते १,५१,१०० रुपये इतका पगार मिळेल. याशिवाय त्यांना इतर शासकीय भत्ते आणि सुविधा देखील मिळतील. त्यामुळे ही नोकरी केवळ प्रतिष्ठेचीच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन New Registration वर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करावी. लॉग-इन केल्यानंतर अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करावा. सरकारी शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. वेळ न दवडता अर्ज करावा आणि परीक्षेची योग्य तयारी करून या संधीचा लाभ घ्यावा.