राज्यातील महसूल विभागात तब्बल 20 वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला असून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने मंजूर केला आहे.वाढत्या कामाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांना जलद सेवा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या आकृतिबंधानुसार राज्यात एकूण 35,876 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 34,576 नियमित पदे आणि 1,300 बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणारी पदे यांचा समावेश आहे. महसूल विभागातील कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही वाढ आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी महसूल विभागाचा आकृतिबंध 2006 मध्ये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वर्षांत महसूल आणि इतर कामांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे नवीन संरचनेची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली.
नवीन आकृतिबंधात राज्यातील प्रशासकीय रचना अधिक मजबूत करण्यात आली आहे. यामध्ये 6 विभागीय आयुक्तालये, 36 जिल्हाधिकारी कार्यालये, 192 उपविभागीय कार्यालये आणि 360 तहसीलदार कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 2,625 मंडळ कार्यालये आणि 15,747 तलाठी पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय प्रशासकीय सोयीसाठी 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये, 8 उपविभागीय कार्यालये, 2 तहसीलदार कार्यालये आणि 69 अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. या बदलामुळे नागरिकांना सेवा मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कामकाजात गती येईल आणि प्रशासन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.