महापालिकेत ७,३३६ पदे रिक्त; भरतीअभावी कर्मचाऱ्यांची कमतरता

पुणे महापालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल ७ हजार ३३६ पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांत महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्या तुलनेत महापालिकेत नोकरभरती कमी असल्याने प्रत्येक महिन्यात रिक्त पदांची संख्या वाढत आहे.

 

महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३२ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महापालिका म्हणून पुणे महापालिकेचा क्रमांक लागतो. पुणे महापालिकेत वर्ग १ ते वर्ग ४ यांची १६ हजार ३६९ इतकी पदे आहेत. त्यापैकी सध्या ९ हजार ३३ पदे भरण्यात आली असून, ७ हजार ३३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे वर्ग तीन आणि वर्ग चारची असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

 

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये शेवटची भरती करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने भरती प्रकिया राबवलेली नाही. महापालिकेने अभियंता पदासाठी गेल्या वर्षी अर्ज मागवले होते. आरक्षणाच्या कारणांमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.

 

वारसांना नोकरी

 

महापालिकेत सेवेला असणाऱ्या आणि ज्यांना घाण भत्ता लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर या संदर्भातील खटला सुरू होता. न्यायालयाने याबाबत निर्णय दिला असून, ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेचा घाण भत्ता लागू आहे, अशा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेने सेवेत घ्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. यासाठी महापालिकेकडे ३०० कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्याची तपासणी सुरू करण्यात आल्याचे प्रसाद काटकर यांनी सांगितले.

 

महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.