पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती | १६९ पदांसाठी असा करा अर्ज

प्राप्त मार्गदर्शनानुसार महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या पदाची भरती प्रक्रिया स्थगित करून बिंदुनामावली नोंदवही विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे मागासवर्ग कक्ष यांचेकडे तपासणी करणेसाठी पाठविण्यात आली होतीं.

त्यानुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे मागासवर्ग कक्ष यांचेकडून बिंदुनामावली तपासणीअंती प्राप्त झाल्यानुसार सद्यस्थितीत १७१ पदे रिक्त आहेत. त्यापैकी ०९ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तत्कालीन रिक्त पदांच्या अनुशेष मिळून ११३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस एक वर्ष उलटून गेले आहे.

बिंदुनामावली नोंदवही नुसार उपलब्ध पद संख्येच्या अनुषंगाने सुधारित नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत महापालिका आयुक्त यांचेकडे चर्चा झाली आहे. त्यानुसार राज्य सरकार कडे मार्गदर्शन मागवण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जाहिरातीच्या अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास जे उमेदवार पात्र होते परंतु एक वर्ष कालावधी उलटून गेल्याने जे उमेदवार सुधारित नवीन जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्यास सद्यस्थितीत वयाधीक ठरत असल्याने अर्ज सादर करण्यास अपात्र ठरतील, अशा उमेदवारांबाबत प्रशासन स्तरावरील तांत्रिक अडचण लक्षात घेता प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील एकूण २७८७९ उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी शासन निर्णय २५/०४/२०१६ नुसार विहित केलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे वयोमर्यादेत तांत्रिक विलंबाचा कालावधी क्षमापित करून अर्ज सादर करण्यास संधी द्यावी. अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकार कडे करण्यात आली होती.

सरकारने महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्य सरकारने भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला आहे. सरकारने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. ११३ ऐवजी १७१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास सरकार कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या आधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते, अशा २७८७९ उमेदवारांपैकी वय मर्यादा उलटून गेलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. शिवाय या सर्व उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. त्यानुसार सुधारित भरती करण्याची प्रक्रिया देखील महापालिका प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने विधी विभागाचा अभिप्राय मागितला होता. त्यानुसार विधी विभागाने आपला अभिप्राय सादर केला होता. त्यानुसार रिक्त पदांच्या अनुशेष नुसार सद्यस्थितीत एकूण १६९ जागा व अजा (SC) प्रवर्गातील १६ जागा रिक्त असल्याने अजा प्रवर्गातील २ जागा कमी करून १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास हरकत नाही. २७८७९ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरून आणि आरक्षित पदांचा तपशील सुधारित करून जाहिरात प्रसिद्ध करण्यास कुठलीही कायदेशीर अडचण नाही.

त्यानुसार आता प्रशासनाने स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार या गोष्टी साठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे.

पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ या संवर्गातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरणेसाठी खालील बाबींस स्थायी समिती मार्फत मुख्य सभेची मान्यता मिळणेस विनंती केली आहे.

१) कनिष्ठ अभियंता स्थापत्य (वर्ग-३) जाहिरात क्र.१/१५७९ एकूण ११३ या पदाकरिता दि. १६/०१/२०२४ ते ०५/०२/२०२४ रोजी एकूण २७,८७९ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरणेस, २) मागासवर्ग कक्ष विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग यांचेकडील दि. ०३/०२/२०२५ रोजीच्या बिंदूनामावलीच्या अहवालानुसार १७१ पदे रिक्त आहेत त्याचे अवलोकन होणेस,
३) लाड/पागे समितीच्या शिफारशीनुसार अजा (SC) प्रवर्गातील ०२ उमेदवारांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर नियुक्ती दिल्याने अजा (SC) प्रवर्गातील सर्वसाधारण कोव्यातील ०२ जागा कमी करणेस.
४) पुणे महानगरपालिका स्तरावरील कनिष्ठ अभियंता स्थापत्य (वर्ग-३) या पदाच्या सरळसेवेच्या ८५% कोट्यातील सद्यस्थितीत रिक्त असलेली एकूण १६९ पदे भरणेस,
५) दि.२१/११/२०२२ रोजीचे शासन निर्णयामध्ये नमूद IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत सदर भरती प्रक्रिया राबविणेस.
९) कनिष्ठ अभियंता स्थापत्य (वर्ग-३) या पदाच्या यापूर्वीच्या सरळसेवेच्या जाहिरात क्र. १/३९८, २०/०७/२०२२ नुसार राबविलेल्या भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणाच्या उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेल्या माजी सैनिकांच्या रिक्त १३ जागा व दिव्यांग प्रवर्गातील (ट व इ) साठी ०१ जागेचा अनुशेष भरणेस,
७) दि. ०९/०१/२०१४ रोजीच्या जाहिरातीनुसार OPEN व EWS या सामाजिक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचा जातीचा प्रवर्ग (SEBC/ OBC) असा सुधारित / बदल करण्यासाठी आवश्यक ती सोय संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध करून देणेस,
८) दि.०९/०१/२०२४ रोजीच्या जाहिरातीनुसार OBC या सामाजिक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचा समांतर आरक्षणातील विकल्प बदलून भूकंपग्रस्त उमेदवार असा सुधारित/ बदल करण्यासाठी आवश्यक ती सोय संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध करून देणेस,

९) सामाजिक व समांतर आरक्षणाच्या सुधारित तक्त्यानुसार संगणकीय प्रणाली तयार करून नव्याने उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यासाठी आवश्यक ती संगणकीय प्रणाली उपलब्ध करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणेस,

१०) जाहिरातीमध्ये प्रस्तावित केलेली पदसंख्या आणि बिंदूनामावलीनुसार आरक्षणामध्ये भरती प्रक्रियेदरम्यान शासनाच्या निर्देशांनुसार किंवा धोरणामध्ये काही बदल झाल्यास त्यानुसार होणारे बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना राहतील अशी माहिती जाहिरातीमध्ये नमूद करणेस,
११) उपरोक्त प्रमाणे भरती राबविण्याच्या प्रक्रीयेसंबंधी IBPS या संस्थेबरोबर करावयाचा पत्रव्यवहार अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे स्वाक्षरीने करणेस, तसेच वेळोवेळी भरती प्रकियेच्या अनुषंगाने घ्यावयाचे निर्णय अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे स्तरावर घेणेस,