रेल्वेमध्ये मोठी भरती, 10 वी उत्तीर्णांना 22 हजार पदांवर नोकरी, ‘इतका’ मिळेल पगार!

फक्त दहावी उत्तीर्ण असल्याने चांगली नोकरी मिळणार नाही, असा अनेकांचा समज असतो. पण आता हा केवळ गैरसमज ठरु शकतो. तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय?

 

मग ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

 

रेल्वे भरती मंडळ म्हणजेच आरआरबीमार्फत भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी लेव्हल-1 साठी जवळपास 22 हजार जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. यात ट्रॅक मेंटेनर ग्रेड-4, पॉइंट्समन, सहाय्यक आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अशा विविध विभागांतील तांत्रिक पदांचा समावेश आहे. ही संधी दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी आहे.त्यामुळे या तरुणांना रेल्वेत स्थिर नोकरी मिळू शकणार आहे.

 

पात्रता निकष

 

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक विभागांसाठी आयटीआय किंवा एनएसी प्रमाणपत्र असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे. ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट मिळते. इतर सरकारी नियमांनुसार आणखी सूट लागू होईल.

 

अर्ज शुल्क

 

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे, पण संगणक आधारित परीक्षेला हजर राहिल्यास 400 रुपये परत मिळतील. एससी, एसटी, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये शुल्क आहे. ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

 

निवड प्रक्रिया

 

निवड चार टप्प्यात होणार आहे. प्रथम संगणक आधारित परीक्षा (सीबीटी), नंतर शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. प्रत्येक टप्प्यात यश मिळवणे गरजेचे आहे. सीबीटीमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान असे विषय येतील, तर पीईटीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाईल, याची नोंद घ्या.

 

अर्ज प्रक्रिया

 

ऑनलाइन अर्ज 21 जानेवारी 2026 पासून सुरू होतील आणि 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत करता येतील. अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा, नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा, वैयक्तिक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज वेळेवर करणे महत्त्वाचे आहे. कारण उशीर झाल्यास संधी हुकू शकते, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

 

पगार आणि इतर फायदे

 

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-1 चे मूलभूत वेतन 18 हजार रुपये मिळेल. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि रेल्वेचे इतर विशेष भत्ते जोडले जातील. ही नोकरी सुरक्षित आणि चांगल्या सुविधांची आहे. ज्यात पेन्शनसारखे फायदेही आहेत.