कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं, साताऱ्याच्या चार तरुणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं, साताऱ्याच्या चार तरुणांचा दुर्दैवी अंत, थरकाप उडवणारा अपघात

 

सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपूलावर हा अपघात घडला.

 

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतणाऱ्या चार तरुण मित्रांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. कराडजवळ काही दिवसांपूर्वीच वाहतुकीस खुला करण्यात आलेल्या नव्या सहापदरी उड्डाणपूलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे. अपघातातील सर्व तरुण साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत.

महालक्ष्मीच्या दर्शनाहून परतताना काळाचा घात

 

 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कातरखटाव गावातील काही तरुण दसऱ्यानिमित्ताने कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडीने गेले होते. दर्शन घेऊन सर्वजण रात्रीच्या सुमारास आपापल्या गावी परतत होते. दरम्यान, रात्री साधारण ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नवीन सहापदरी उड्डाणपूलावर त्यांची स्कॉर्पिओ गाडी एका ट्रकवर मागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चुराडा झाला.

 

या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर आणि मृतकांच्या कुटुंबांवर शोककलंष पसरला आहे. तेजस देशमुख (चालक, वय २५ वर्षे), सागर निंबाळकर (वय २३ वर्षे), सुयश चिंचकर (वय २० वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय २१ वर्षे) अशी अपघातात मृत पावलेल्या चार मित्रांची नावं आहेत. तर ऋतुराज दुबळे (वय २१ वर्षे), शंतनू शिंगाडे (वय २० वर्षे) आणि अमन तांबोळी (वय २३ वर्षे) अशी जखमी मित्रांची नावं आहेत.

पोलिसांची घटनास्थळी धाव

 

 

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम, सचिन देवकर तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व नागरिकांनी मिळून सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.