आषाडी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील अशी माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेनी वारकऱ्यांबाबत घोषणा केली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, वारीमध्ये सहभागी (Ashadhi Wari 2025) होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा गट विमा केला जाणार असून, त्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि तात्पुरत्या आयसीयू सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा.
सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल- Ashadhi Wari 2025
नुकत्याच झालेल्या पावसाच्या माऱ्यामुळं वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. तर, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावेत अशाही सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्या. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल. यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल, अशी ग्वाही सुद्धा शिंदेनी यावेळी दिली.