जलकुंभांच्या संथ कामांवरून प्रशासनाला धरले धारेवर फिल्टर हाऊस व गुरू टॉकीज येथील जलकुंभ दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देश
इचलकरंजी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहा टक्के पाणीकपात लागू केली असताना, इचलकरंजी शहरातील नळांना होणारा अनियमित पाणीपुरवठा आणि रखडलेल्या जलकुंभांच्या कामांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गंभीर प्रश्नाची आमदार राहुल आवाडे यांनी दखल घेत थेट कामाच्या ठिकाणी धाव घेतली. जलकुंभांच्या कामाचा सुमार दर्जा आणि कामातील दिरंगाईवरून त्यांनी मक्तेदारांसह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
शहरात एकीकडे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना, दुसरीकडे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांची कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना पाण्यासाठी अडचणी सहन कराव्या लागत असताना विकासकामे वेळेत पूर्ण का होत नाहीत, असा सवाल उपस्थित करत आमदार आवाडे यांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार आवाडे यांनी शहरातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या फिल्टर हाऊस, गुरू टॉकीज परिसर, यशवंत कॉलनी, साईट नंबर १०२, स्टारनगर आणि तुळजाभवानीनगर येथील जलकुंभांच्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा आणि काम पूर्ण करण्याच्या विलंबाबाबत त्यांनी संबंधित मक्तेदार व अधिकाऱ्यांना जाब विचारला. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून जलकुंभ कार्यान्वित करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
फिल्टर हाऊस आणि गुरू टॉकीज येथील जलकुंभ दोन दिवसांत पूर्ण करून कार्यान्वित करण्याच्या सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या. केवळ कामे सुरू असल्याचे दाखवून चालणार नाही, तर ती वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे, अशी भूमिका आमदार आवाडे यांनी मांडली.
पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेच्या कामात दिरंगाई आणि निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या पाहणीच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला देण्यात आला. यावेळी महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, पाणीपुरवठा अभियंता बाजीराव कांबळे,दीपक रावळ, राजू बोंद्रे, नितेश पोवार यांच्यासह संबंधित भागातील नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.