लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना आजपासूनच 1500 रुपये जमा झाले आहेत.
मकरसंक्रांतीपूर्वी रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार आता प्रत्यक्षात पैसे खात्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक महिलांनी थोडा दिलासा व्यक्त केला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व महिलांना हा हप्ता मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बहुतांश लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम उद्यापर्यंत जमा होईल, अशी माहिती आहे. याआधी विविध मंत्र्यांनी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होतील, अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात फक्त 1500 रुपयांचाच हप्ता जमा झाल्याने अनेक महिलांच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे आनंदासोबतच काही प्रमाणात नाराजीही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करत एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम देणे नियमबाह्य ठरू शकते, असे सांगितले. त्यामुळे सध्या फक्त एका महिन्याचाच हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर पुढील हप्त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे.
बँकेत पैसे जमा झाले का कसे तपासाल?
त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, याकडे आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले असून पुढील निर्णयाची सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही, हे तपासणे अतिशय सोपे आहे. रक्कम जमा झाल्यानंतर बँकेकडून तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो. तसेच तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपमध्ये लॉग इन करून ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासू शकता. ज्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी थेट बँकेत जाऊन खाते तपासण्याचा पर्यायही वापरू शकतात.