केंद्र सरकारने आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा योजना सुरू केली आहे. आजारपणात रुग्णालयात जाताना जुने रिपोर्ट, डॉक्टरांच्या चिठ्ठ्या आणि जड फाईल्स सोबत नेणे खूप त्रासदायक असते.
काही वेळा महत्त्वाची वैद्यकीय कागदपत्रे हरवतात किंवा वेळेवर सापडत नाहीत, त्यामुळे उपचार घेण्यात अडचणी येतात. या अडचणींवर उपाय म्हणून सरकारने ही योजना आणली आहे.
या योजनेंतर्गत आभा हे १४ अंकी डिजिटल आरोग्य ओळखपत्र दिले जाते. या आयडीमध्ये व्यक्तीचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड, त्यात काय आजार झाला, कधी उपचार झाले, कोणत्या तपासण्या केल्या, कोणती औषधे दिली आणि तो कोणत्या आरोग्य योजनेशी जोडलेला आहे, ही सर्व माहिती डिजिटल पद्धतीने साठवली जाते. त्यामुळे रुग्णालयात कागद-पत्र घेऊन फिरण्याची गरज लागत नाही. तसेच, देशाच्या कुठल्याही रुग्णालयात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होते. विशेष म्हणजे, हे आभा खाते तयार करणे पूर्णपणे मोफत आहे.
योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश देशात डिजिटल आरोग्य सुविधा मजबूत करणे हा आहे. तसेच, रुग्णांचे संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात साठवून आरोग्य सेवा देणे हा आहे.
योजनेचे फायदे
आभा म्हणजे एक डिजिटल आरोग्य ओळखपत्र आहे. यात पैसे किंवा विमा मिळत नाही, तर तुमचे रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन आणि आरोग्य नोंदी सुरक्षितपणे साठवल्या जातात. त्यामुळे आरोग्यविषयक कागदपत्रांची गरज नसते. तसेच,आरोग्याबाबतची माहिती कोणत्या डॉक्टर किंवा रुग्णालयाशी शेअर करायची हे स्वतः ठरवू शकता.
योजनेच्या अटी
भारतातील कोणताही नागरिक आभा खाते तयार करू शकतो.
वयाची कोणतीही अट नाही.
सर्व जाती व उत्पन्न गटातील नागरिक पात्र आहेत.
आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र आवश्यक आहे.
आधारद्वारे नोंदणी करताना मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
आरोग्यविषयक माहिती शेअर करण्यासाठी लाभार्थ्याची संमती आवश्यक असते.
हे कार्ड केवळ डिजिटल ओळखपत्र आहे, त्यामुळे आरोग्य विमा कव्हरेजची हमी मिळत नाही.
योजनेची पात्रता
भारतातील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात, मात्र NRI (अनिवासी भारतीय) पात्र नाहीत.
कोणत्याही जाती, धर्म किंवा उत्पन्न गटातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अर्जासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (अनिवार्य)
मोबाइल नंबर (आधारशी लिंक)
रेशन कार्ड
रहिवासी दाखला
आधार नसल्यास पर्यायी कागदपत्रे- ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र
पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, पाणी बिल किंवा मतदार ओळखपत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाइन पद्धत:
abha.abdm.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
Create ABHA Number वर क्लिक करा.
आधार क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाका व ओटीपीद्वारे पडताळणी करा.
नाव, जन्मतारीख, पत्ता ही माहिती भरावी.
१४ अंकी आभा नंबर तयार होईल व कार्ड डाउनलोड करा.
ऑफलाइन पद्धत:
जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा नोंदणीकृत रुग्णालयात जा.
आवश्यक कागदपत्रे सोबत न्या.
आयुष्मान मित्राच्या मदतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते.