पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून महिन्याला मिळवा १७ हजार रुपये व्याज; समजून घ्या योजनेचे गणित

निवृत्तीनंतर मासिक पगार बंद झाल्यावर नियमित खर्च कसा भागवायचा, ही अनेक ज्येष्ठ नागरिकांची चिंता असते. अशा वेळी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) नियमित उत्पन्नाचा पर्याय ठरू शकते.

 

या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते आणि त्यावरील व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी खात्यात जमा होते. पती-पत्नी संयुक्त खाते उघडूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, या योजनेतून मिळणारे व्याज करपात्र आहे.व्याजदर किती आहे?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकारच्या लघुबचत योजनांपैकी एक आहे. या योजनेवरील व्याजदर सरकारकडून प्रत्येक तिमाहीत निश्चित केला जातो. सध्या या योजनेवर वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळत आहे.

 

कोण उघडू शकतो खाते?

या योजनेत ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. गुंतवणूक १,००० रुपयांच्या पटीत करता येते. एका खात्यात कमाल ३० लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागते.

 

मुदत आणि कर नियम

मुदत संपल्यानंतर ती ३-३ वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवता येते. मुदत पूर्ण झाल्यावर मूळ गुंतवणुकीची रक्कम परत मिळते. या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळू शकतो.

 

महत्त्वाचे

◼️ पात्रता : वय किमान ६० वर्षे.

◼️ कमाल गुंतवणूक : ३० लाख रुपये.

◼️ व्याज वितरण : दर तीन महिन्यांनी.

◼️ मुदत : ५ वर्षे, पुढे वाढविण्याची सुविधा.

◼️ करसवलत : कलम ८०सी अंतर्गत पात्रता; मात्र व्याजावर कर लागू होतो.

 

आकडेवारीतून समजून घ्या योजनेचे नेमके गणित

◼️ वार्षिक व्याजदर – ८.२ टक्के

◼️ एकूण गुंतवणूक – २६,००,०००

◼️ दर तीन महिन्यांचे व्याज – ५३,३००

◼️ अंदाजे मासिक उत्पन्न – १७,७६६

◼️ योजनेची मुदत – ५ वर्षे

◼️ ५ वर्षांतील एकूण व्याज – १०,६६,०००

◼️ मुदतपूर्तीनंतर परत मिळणारी मूळ रक्कम – २६,०००,००

◼️ एकूण प्राप्त रक्कम (मूळ रक्कम व्याज ३६,६६,०००

 

फायदा कसा होतो?

◼️ निवृत्तीनंतर नियमित व्याज उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो.

◼️ दर तीन महिन्यांनी मिळणारे व्याज दैनंदिन खर्च भागविण्यास मदत करू शकते.

◼️ पती-पत्नी संयुक्त खाते उघडून बचतीचे नियोजन करू शकतात.

◼️ मोठी एकरकमी रक्कम उपलब्ध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.

◼️ कुटुंबाला देखील हातभार लागू शकतो.

◼️ उतारवयातील अवलंबित्व कमी होईल.