प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23 व्या हप्त्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांना 24व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचा दावा करण्यात आला असून या हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळतील, असेही व्हिडिओमध्ये सांगितले जात आहे. या दाव्यानंतर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
व्हिडिओत काय सांगितले?
सोशल मीडियावर व्हायरल होत आलेल्या या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपयांची रक्कम जमा होईल, असा दावा यात करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये 24व्या हप्त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या दाव्यामागील वास्तव आता समोर आले आहे.
काय आहे सत्य?
सरकारच्या PIB फॅक्ट चेकने आपल्या X अकाऊंटवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सत्यता सांगितली आहे. PIB ने हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगत यात कोणतीही सत्यात नसल्याचे स्पष्ट केले. एजन्सीच्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता म्हणून 4 हजार रुपये देण्यात येणार असल्याचा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला अधिकृत सरकारी घोषणा समजू नये.
24वा हप्ता नेमका कधी मिळणार?
पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख केंद्र सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी हप्ता खात्यात जमा होईल, असे सध्या म्हणता येणार नाही.
PIBच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात आला होता. आता 24व्या हप्त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ किंवा मेसेजवर विश्वास ठेवण्याऐवजी केंद्र सरकारच्या अधिकृत माध्यमांवरून मिळणारी माहितीवर विश्वास ठेवावा.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
सरकारी योजनांशी संबंधित बनावट व्हिडिओ आणि चुकीच्या माहितीचा प्रसार सोशल मीडियावर अनेकदा केला जातो. त्यामुळे अशा कोणत्याही दाव्याची पडताळणी केल्याशिवाय तो पुढे शेअर करू नये. PIB फॅक्ट चेकनेही नागरिकांना अशा भ्रामक माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.