महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांचे पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस महिलांच्या बँक खात्यात जमा झाला होता.
मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे दसऱ्याच्या सणाला १५०० रुपये मिळणार की दिवाळीत दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये खात्यात जमा होणार, याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे.
पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेतल्यास दसऱ्यानंतर यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी होऊ शकतो. त्यानंतर २५ ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिवाळीत दोन्ही हप्ते एकत्र मिळणार?
दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हप्त्याची रक्कम जमा झाली नाही, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये दिवाळीच्या काळात, म्हणजेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे महिलांचे लक्ष
राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हप्त्याचे वितरण कधी होणार आणि दोन महिन्यांची रक्कम एकत्र मिळणार की स्वतंत्रपणे, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्यांबाबत राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो आणि महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.