एस.टी. प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ तिकिटावर मिळणार 15% सूट, आजपासून योजना लागू

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक उपयुक्त योजना जाहीर केली आहे. 1 जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या या नव्या योजनेनुसार, एसटीच्या लांब व मध्यम अंतराच्या बससेवेसाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण भाडे भरलेल्या प्रवाशांना तब्बल 15 टक्के सवलत मिळणार आहे.

 

 

सवलतीची अट आणि कालमर्यादा

 

ही योजना 150 किमी किंवा त्याहून अधिक अंतराच्या बस प्रवासावर लागू असेल.

सवलत फक्त पूर्ण भाडे भरणाऱ्या प्रवाशांनाच दिली जाईल (सवलत मिळणाऱ्या प्रवाशांवर लागू नाही).

ही योजना उन्हाळी आणि दिवाळी गजबजलेल्या काळात लागू होणार नाही. उर्वरित काळात मात्र वर्षभर चालू राहील.

योजनेची घोषणा व अंमलबजावणी

 

1 जून रोजी एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता ही योजना सर्व प्रकारच्या एसटी बससेवा – सामान्य, सेमी लक्झरी, शिवशाही किंवा इतरांवर लागू केली जात आहे.

 

भाविक व चाकरमान्यांना याचा विशेष फायदा

 

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांनी जर आगाऊ आरक्षण केलं, तर त्यांना याच योजनेचा थेट लाभ मिळू शकतो.

तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही ही सवलत लागू आहे. पण फक्त नियमित बसेससाठी. अतिरिक्त बसेसवर ही सवलत लागू होणार नाही.

इ-शिवनेरी प्रवाशांसाठी खास संधी

 

मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या इ-शिवनेरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही ही योजना लागू आहे. जर प्रवाशांनी वेळेआधी आरक्षण केलं, तर त्यांना तिकीट दरात थेट 15 टक्के कपात मिळेल.

 

आरक्षणासाठी कुठे आणि कसे करता येईल?

 

प्रवाशांना ही सवलत मिळवण्यासाठी खालील तीन माध्यमांचा उपयोग करता येईल:

 

एसटीचे अधिकृत संकेतस्थळ: public.msrtcors.com

मोबाईल अ‍ॅप: msrtc Bus Reservation

स्थानिक तिकीट खिडक्या

महामंडळाचं आवाहन

 

परिवहन महामंडळाने राज्यभरातील नागरिकांना ही संधी सोडू नये आणि प्रवासाचे आरक्षण लवकर करून सवलतीचा फायदा घ्यावा, असं आवाहन केलं आहे.