ICSI अभय योजना सुरू; कंपनी सचिव अभ्यासक्रम पूर्ण करण्याची पुन्हा संधी

कंपनी सचिव अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन कोणत्याही टप्प्यावर अभ्यासक्रम सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ने अभय योजना (ॲम्नेस्टी स्कीम) आणली आहे.

 

 

या अंतर्गत आतापर्यंत देशभरातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पुन्हा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 

‘द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’चे अध्यक्ष (आयसीएसआय) पवन चांडक यांनी ही माहिती दिली. आयसीएसआयतर्फे कंपनी सचिवांसाठी पुण्यात आयोजित केलेल्या २७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर चांडक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. कंपनी सचिव हा अभ्यासक्रम बारावीनंतर किंवा पदवीनंतर करता येतो. बारावीनंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते, तर पदवीनंतर थेट एक्झिक्युटिव्ह टप्प्यावर प्रवेश मिळतो. परंतु, बारावीनंतर प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेश घेतल्यास दोन वर्षे वाचतात.