जेजुरी अपघातात नऊ जणांचा मृत्यू, पंतपजेजुरी मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यातील चौघांची स्थिती गंभीर आहे.
या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
‘जेजुरी मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात नऊ जणांचा जीव गेला. ही घटना दुर्दैवी आहे. माझ्या मनाला यामुळे अतीव वेदना झाला. आपल्या आप्तस्वकीयांना ज्यांनी गमावलं त्यांच्याविषयी माझ्या सहवेदना. जे या अपघातात जखमी झाले त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो.’ या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातात जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्याजवळ एक पिकअप टेम्पो थांबला होता. टेम्पोतील सामान खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघे सामान उतरवत होते. यावेळी पुण्याकडून मोरगावकडे निघालेल्या एका भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, शेजारी थांबलेल्या एका दुसऱ्या मोटारीला त्यानंतर धडक बसली. टेम्पोतील सामान उतरविणारे दोघे तसेच, ढाब्यासमोर थांबलेले तिघे आणि मोटारीतील तिघांचा अशा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. ढाबाचालक आणि कामगारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मोटारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं काय?
१) सोमनाथ रामचंद्र वायसे
२) रामू संजीवन यादव
३) अजयकुमार चव्हाण
४) अजित अशोक जाधव
५) किरण राऊत
६) सार्थक राऊत
७) अश्विनी ऐसार
८) अक्षय शंकर राऊत
अशी अपघातात मृत्यू झालेल्या आठ जणांची नावं आहेत. तर नवव्या मृताची ओळख पटू शकलेली नाही
जेजुरी मोरगाव रस्त्यावर अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटार, टेम्पोचा चुराडा झाला होता. अपघातानंतर जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले.