जीवनात कधी कोणती अनपेक्षित परिस्थिती येईल हे सांगता येत नाही. अचानक उद्भवलेले वैद्यकीय उपचार असोत, लग्नाचा खर्च असो किंवा व्यवसायातील एखादी संधी-अशा वेळी मोठ्या रकमेची तातडीने गरज भासते.
जर तुमच्याकडे पुरेशी बचत किंवा आपत्कालीन निधी नसेल, तर कर्ज घेणे हाच एकमेव मार्ग उरतो. अशा वेळी आपल्यासमोर प्रामुख्याने दोन पर्याय असतात: वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि सोने कर्ज (Gold Loan). पण या दोन्हीपैकी नेमका कोणता पर्याय निवडावा? हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे फायदे आणि तोटे समजून घेणे आवश्यक आहे.
कमी क्रेडिट स्कोअर असल्यास काय करावे?
वैयक्तिक कर्ज हे ‘अनसिक्युअर्ड लोन’ (Unsecured Loan) असते, म्हणजेच यासाठी काहीही तारण ठेवावे लागत नाही. त्यामुळे बँका तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) बारकाईने तपासतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल, तर वैयक्तिक कर्ज मिळणे कठीण होते किंवा खूप जास्त व्याजदराने ते दिले जाते.
दुसरीकडे, सोने कर्ज (Gold Loan) हे तारणावर आधारित असते. तुम्ही बँकेकडे तुमचे सोने गहाण ठेवता, त्यामुळे बँकेची जोखीम कमी होते. परिणामी, तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असला तरीही तुम्हाला सहजपणे सोने कर्ज मिळू शकते. ज्यांचा क्रेडिट स्कोअर खराब आहे त्यांच्यासाठी सुवर्ण कर्ज हा एक उत्तम आधार ठरतो.
२. कर्जाचा कालावधी आणि उद्दिष्ट
कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला ते किती काळासाठी हवे आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
वैयक्तिक कर्ज: जर तुम्हाला मोठ्या रकमेची गरज असेल आणि ती परत करण्यासाठी १ ते ५ वर्षांचा दीर्घ कालावधी हवा असेल, तर वैय क्तिक कर्ज घेण्याची शिफारस केली जाते. याचे हप्ते (EMI) ठराविक काळासाठी विभागलेले असतात.
सोने कर्ज : जर तुम्हाला केवळ ३ ते ६ महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी पैशांची नड असेल, तर सोने कर्ज हा उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही कमी काळासाठी पैसे घेऊन आपले सोने सोडवून घेऊ शकता.
३. प्रक्रियेचा वेग: कुठे लवकर पैसे मिळतात?
आजच्या धावपळीच्या युगात ‘वेळ’ अत्यंत महत्त्वाची आहे.
वैयक्तिक कर्ज : यासाठी कागदपत्रांची पूर्तता, उत्पन्न दाखला आणि पडताळणी यामध्ये बराच वेळ जातो. बँकेला कर्ज मंजूर करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागू शकतो.
सोने कर्ज : सोन्याचे कर्ज हे सर्वात जलद मिळणाऱ्या कर्जांपैकी एक आहे. तुम्ही सोने घेऊन बँकेत गेलात की, सोन्याची शुद्धता तपासून काही तासांतच कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे आर्थिक आणीबाणीच्या (Emergency) परिस्थितीत सोने कर्ज हा सर्वात वेगवान पर्याय ठरतो.
वैयक्तिक कर्ज आणि सोने कर्ज : तुलनात्मक तक्ता
वैशिष्ट्ये : सोने कर्ज (Gold Loan) : वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
सुरक्षा : सोने तारण ठेवावे लागते : काहीही तारण ठेवावे लागत नाही
क्रेडिट स्कोअर : कमी स्कोअर असला तरी चालतो. : उच्च क्रेडिट स्कोअर आवश्यक असतो.
प्रक्रिया वेळ : काही मिनिटांत किंवा तासांत. : २ ते ७ कार्य दिवस लागू शकतात.
व्याज दर : सामान्यतः वैयक्तिक कर्जापेक्षा कमी. : रिस्क जास्त असल्याने व्याजदर जास्त असतो.
कालावधी : अल्प मुदतीसाठी (Short term) : दीर्घ मुदतीसाठी (Long term)
आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला
आर्थिक तज्ज्ञ नेहमी असा सल्ला देतात की, प्रत्येकाकडे किमान ६ महिन्यांच्या खर्चाचा ‘आपत्कालीन निधी’ (Emergency Fund) असावा. तरीही, जर कर्ज घेण्याची वेळ आलीच, तर केवळ गरज असेल तितकीच रक्कम कर्ज म्हणून घ्यावी.