पुणे जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या (Pune Job Fair 2026) तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एशियन कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नऱ्हे-धायरी रोडवरील पारी कंपनी चौक येथील एशियन कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे. (
या रोजगार मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील सुमारे 24 कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमार्फत जवळपास 1900 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उत्पादन, सेवा, विक्री, तांत्रिक आणि इतर विविध क्षेत्रांमधील पदांसाठी भरती केली जाणार असून 10 वी, 12 वी, डिप्लोमा तसेच पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात संधी मिळणार आहे.
राज्यात बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेता अशा रोजगार मेळाव्यांद्वारे उद्योग आणि नोकरी इच्छुक यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. उमेदवारांना एका ठिकाणी अनेक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि प्रत्यक्ष मुलाखत देण्याची संधी मिळते. त्यामुळे अल्पावधीत नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत सविस्तर माहिती आणि नोंदणीसाठी [www.rojgar.mahaswayam.gov.in](http://www.rojgar.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्यावी. मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील विविध पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार असल्यामुळे उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि आवश्यक अर्जांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधता येईल. तसेच 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावरही माहिती उपलब्ध असल्याचे संबंधित कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.