‘मुख्यमंत्री समुपदेशन’ योजनेअंतर्गत गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यासाठी गोवा शिक्षण विकास महामंडळाने (जीईडीसी) ६५ समुपदेशक आणि २ पर्यवेक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर निवडक उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.
समुपदेशक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मानसशास्त्र किंवा समाजकार्य या विषयांतील पदव्युत्तर पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज महामंडळाच्या आल्त-पर्वरी येथील कार्यालयात सादर करावेत, असे महामंडळाने नमूद केले आहे.
असा असेल पगार
समुपदेशक पदासाठी दरमहा ३० हजार रुपये तर पर्यवेक्षक पदासाठी दरमहा ३५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या नियुक्त्या पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाच्या असून त्यांचा कालावधी ११ महिन्यांचा असेल.