जर तुम्ही केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये BE/BTech उत्तीर्ण असाल आणि GATE 2025 परीक्षा पात्र ठरलात, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. Engineers India Limited (EIL) ने मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 2026 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
एकूण 52 पदांसाठी ही भरती असून, निवड पूर्णपणे GATE 2025 स्कोरवर आधारित असणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे संबंधित शाखेत (केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल) पूर्णवेळ BE/B.Tech/इंजिनियरिंग पदवी असणे आवश्यक आहे. किमान 65% गुण आवश्यक आहेत. त्यासोबत GATE 2025 चा वैध स्कोर असणे अनिवार्य आहे.
ही भरती 2024 किंवा 2025 मध्ये इंजिनियरिंग पूर्ण केलेल्या किंवा सध्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 2023 किंवा त्यापूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीस पात्र ठरणार नाहीत. या भरतीसाठी कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. उमेदवारांची निवड थेट GATE 2025 स्कोरच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टवरून केली जाईल. त्यामुळे चांगला स्कोर असलेल्या उमेदवारांना मोठी संधी मिळू शकते.
पगार आणि सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात दरमहा सुमारे ₹60,000 वेतन दिले जाईल. यासोबत निवास आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. जर या सुविधा उपलब्ध नसतील, तर ₹15,000 पर्यंत भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ₹60,000 ते ₹1,80,000 दरमहा वेतनमान मिळेल. एकूण वार्षिक पॅकेज (CTC) सुमारे ₹20.31 लाखांपर्यंत जाऊ शकते. यामध्ये बोनस, भत्ते, निवृत्ती लाभ तसेच प्रवास व निवास सुविधा यांचा समावेश आहे.
EIL मध्ये नोकरी का करावी?
EIL ही एक प्रतिष्ठित सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपनी असून येथे काम केल्यास करिअरमध्ये वेगाने प्रगतीची संधी मिळते. चांगले वेतन, सुविधा आणि स्थिरता यामुळे अनेक उमेदवारांचे हे स्वप्नवत ठिकाण आहे.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी EIL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची अधिसूचना वाचावी आणि ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करताना GATE स्कोरकार्ड, मार्कशीट, ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे तयार ठेवावीत. जर तुमचा GATE 2025 स्कोर चांगला असेल आणि पात्रता पूर्ण होत असेल, तर ही संधी अजिबात दवडू नका. कमी स्पर्धा आणि थेट निवड प्रक्रियेचा फायदा घेऊन प्रतिष्ठित PSU मध्ये नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.