PNG कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवा नियम आजपासून लागू, केंद्र सरकारने काढली ऑर्डर; केला मोठा बदल

पाइप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन घेणाऱ्या LPG ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने LPG पुरवठा आणि वितरणाशी संबंधित नियमांमध्ये बदल करत ग्राहकांना अधिक लवचिकता देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

नवीन नियमांनुसार आता नागरिकांना PNG कनेक्शन घेतल्यानंतर आपले LPG कनेक्शन बंद करण्यासोबतच भविष्यात ते पुन्हा सुरू करण्याची सुविधाही मिळणार आहे.

 

केंद्र सरकारने 25 मे 2026 रोजी LPG Regulation of Supply and Distribution Amendment Order 2026 जारी केला. या निर्णयामुळे विशेषतः वारंवार शहर बदलणारे नागरिक, ट्रान्सफरेबल नोकरी करणारे कर्मचारी आणि स्थलांतरित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या मते ग्राहकांना अधिक सुविधा आणि पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 

नवीन नियमात काय बदल झाले?

 

नवीन नियमांनुसार ज्या ग्राहकांनी आपल्या घरात PNG कनेक्शन बसवले आहे. ते आता 30 दिवसांच्या आत LPG कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज करू शकतील. यापूर्वी या प्रक्रियेसंदर्भात अनेक अडचणी आणि संभ्रम निर्माण होत होता.

 

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता ग्राहकांना ट्रान्सफर व्हाउचर सुविधा मिळणार आहे. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती भविष्यात अशा भागात राहायला गेली जिथे PNG सुविधा उपलब्ध नाही तर त्या ट्रान्सफर व्हाउचरच्या आधारे ती व्यक्ती आपले LPG कनेक्शन पुन्हा सुरू करू शकते.

 

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

 

सरकारच्या म्हणण्यानुसार ट्रान्सफरेबल नोकरी असलेले कर्मचारी, स्थलांतरित कुटुंबे, विद्यार्थी, भाड्याच्या घरात राहणारे नागरिक आणि वारंवार शहर बदलणारे लोक यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

 

आतापर्यंत अनेक ग्राहक PNG कनेक्शन घेतल्यानंतरही LPG कनेक्शन बंद करत नव्हते. कारण भविष्यात पुन्हा LPG ची गरज भासल्यास नवीन कनेक्शनसाठी पुन्हा सिक्युरिटी डिपॉझिट, कागदपत्रांची प्रक्रिया आणि वेळखाऊ कार्यपद्धतीला सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र आता ट्रान्सफर व्हाउचर सुविधेमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

 

सरकारचे काय म्हणणे?

 

हा निर्णय ग्राहकांना अधिक सुविधा आणि फ्लेक्सिबिलिटी देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे गॅस वितरण व्यवस्था अधिक सुव्यवस्थित करण्यासही मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

 

तज्ज्ञांच्या मते आगामी काळात देशातील मोठ्या शहरांमध्ये PNG नेटवर्क झपाट्याने विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवीन नियम लाखो शहरी ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.