रिलायन्स जिओने जिओभारत व्हि 4 हा 4G कीपॅड फोन 799 रुपयांत लाँच केला आहे.
या फोनमध्ये जिओ-पे, सेफ्टी शील्ड आणि व्हिडिओ-स्ट्रीमिंगसारखी स्मार्ट फीचर्स देण्यात आली आहेत.
हा फोन 123 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह वापरता येणार असून, तो ब्लू आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.
सध्या अनेक टेक कंपन्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्यावर अधिक भर देत आहेत. काही कंपन्यांनी अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. तर अनेक कंपन्या वाढत्या किंमतीसह नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत आहेत. यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा खर्च सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता अनेकांचे असे मत आहे की, नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याऐवजी साधा किपॅड फोन खरेदी करावा, ज्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याऐवजी कमी होऊ शकतात.
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिओने एक नवीन 4G फोन लाँच केला आहे. रिलायंस जियोने त्यांच्या जिओभारत सिरीजमधील नवीन अतिशय स्वस्त 4G फोन JioBharat V4 लाँच केला आहे. या फोनची किंमत 800 रुपयांहून कमी आहे. या फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. जे लोकं महागडा स्मार्टफोन खरेदी करू शकत नाही अशा लोकांपर्यंत 4G कनेक्टिविटी पोहोचवणं, या उद्देशाने कंपनीने त्यांचा नवीन फोन लाँच केला आहे. ज्यांना कीपॅडसह हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घ्यायचा आहे, अशा लोकांसाठी हा फोन फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Jio)
जिओभारत व्हि 4 ची किंमत आणि उपलब्धता
जिओभारत व्हि 4 फोन 799 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ब्लू आणि ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायात हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. जिओची ऑफिशियल वेबसाइट जिओ.कॉम, जिओमार्ट, रिलायंस डिजिटल किंवा जवळील स्टोअरमधून तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.
जिओभारत व्हि 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
मॉडर्न लुकसह जिओचा नवीन फोन लाँच करण्यात आला आहे. यामध्ये मॉनिटरिंग आणि यूजर मॅनेजर सारखे स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे तुम्ही सुरक्षित पद्धतीने तुमच्या कुटूंबासोबत संवाद साधू शकता. या स्वस्त 4G कीपॅड फोनवर यूजर्स जियो नेटवर्कच्या मदतीने चित्रपट, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि लाईव्ह स्पोर्ट्स हाइलाइट्स पाहू शकणार आहेत. या फोनमधील सर्वात खास फीचर म्हणजे जिओपे सपोर्ट. तुम्ही या कीपॅड फोनवरून थेट बँक अकाऊंटद्वारे सुरक्षित यूपीआय पेमेंट करू शकता.
या फोनमध्ये सेफ्टी शील्ड आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही जिओभारत व्हि 4 फोन तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला जिओ थिंग नावाच्या अॅपचा वापर करावा लागणार आहे. यानंतर तुम्ही तुमच्या फोनमधून जिओभारत व्हि 4 चे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहात आणि यासोबतच अॅप्स आणि कॉल्स देखील मॅनेज करू शकणार आहात. जिओ थिंग नावाच्या अॅपचा वापर करून संशयास्पद कॉल्स किंवा मेसेज ब्लॉक देखील करू शकणार आहात. हा फोन वापरण्यासाठी तुम्हाला महागडा रिचार्ज करण्याची देखील गरज नाही. तुम्ही केवळ 123 रुपयांच्या प्लॅनसह या फोनचा वापर करू शकता.