नितीन गडकरींचा मोठा विजय, E 20 इंधनाबाबत पोस्ट कराल तर…कोर्टाने ती परवानगी दिली!

सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची एकच चर्चा आहे. या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता सोशल मीडियावर नवी चळवळ उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन चळवळीलाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ई२० इंधनाविरोधात पुकारण्यात आलेल्या या व्हर्च्यूअल आंदोलनात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. ‘E20 जनता पार्टी‘ नावाच्या सोशल मीडिया खात्याला लाखो लोकांनी फॉलो केले आहे. ई२० इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होते, असा दावा केला जातोय. हा दावा केला जात असतानाच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बाजूने न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सोशल मीडियावर E20 इंधनावर सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

 

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

न्यायालयाच्या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. ई२० इंधनासंदर्भात नितीन गडकरींविरोधात अनेक आक्षेपार्ह पोस्ट पडत आहेत. या पोस्टमुळे नितीन गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने आता ई२० इंधनावरून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस धाडण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार मेटा, गूगल, डीपफेक एआय कंटेंट पसरवणाऱ्याविरोधात कारवाई होणार आहे. म्हणूनच आता ई२० इंधनाविरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

 

नितीन गडकरी यांच्यावर होत आहे टीका

गेल्या अनेक दिवासांपासूनम ई२० पेट्रोलमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली जात आहे. लोकांच्या इच्छेविरुद्ध ई२० इंधनाचा वापर करण्यास सक्ती केली जात आहे. या इंधनामुळे वाहनांच्या इंजिनीवर तसेच मायलेजवर परिणाम होतोय, असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे नितीन गडकरी यांच्यावर टीका केली जातेय. सोशल मीडियावर त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जातेय. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात नितीन गडकरी यांच्याविरोधातही बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.