ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी… पण घातल्या मुंबई महापालिकेने 24 अटी, या अटींचे पालनं न झाल्यास… 

‘अरे आवाज कुणाचा?’ या गगनभेदी आरोळीची उत्सुकता आजही मुंबईत टिकून आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली शिवसेना दसरा मेळाव्याची परंपरा सालाबादाप्रमाणे टिकून आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आवाज दादारमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क-शिवाजी पार्कमध्ये 20 ऑक्टोबर, मंगळवारी घुमणार आहे. उद्धव सेनेले दसरा मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी मुंबई महापालिकेने 24 अटी घातल्या आहेत. आता या शर्तींची शर्थ करावी लागणार की नव्या वादाला तोंड फुटणार याची चर्चा रंगली आहे.

 

खासदार अनिल देसाई यांनी दसरा मेळाव्यासाठी रीतसर अर्ज केला होता. पालिकेने मेळाव्यासाठी दोन दिवसांची परवानगी दिली आहे. सोमवारी दसरा मेळाव्याची पूर्वतयारी आणि मंगळवारी, 20 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा अशा दोन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देतानाच पालिकेने 24 अटी आणि शर्ती लादल्या आहेत. मैदानाच्या वापरासाठी प्रत्येकी 500 रुपये आणि 18 टक्के जीएसटी तसेच 250 रुपये परवाना शुल्क आकारण्यात आले आहे. 20 हजार रुपयांची अनामत रक्कमही भरावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर कार्यक्रमाला परवानगी नसेल. या मैदानावर वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियमही पाळावे लागणार आहे.

 

कोणत्या त्या 24 अटी?

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दीर्घ इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये दसरा मेळाव्याला सुरुवात केली. तेव्हापासून शिवाजी पार्क, दसरा मेळावा आणि शिवसेना असे समीकरण जुळलेले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर या मैदानासाठी दोन्ही गट झुंजले. आता दोन वेगवेगळे मेळावे होतात. विचारांचं सोनं वाटता वाटता विखारी टीका होते.

 

दोन दिवसांसाठी शिवाजी पार्क मैदानावर उद्धव सेनेला सशुल्क परवानगी देण्यात आली आहे.

 

या मैदानावर वाहनांची गर्दी करता येणार नाही.

 

हायकोर्टाच्या आदेशाचे आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील.

 

मैदानात खोदकाम, खड्डे करता येणार नाहीत.

 

कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करून द्यावे लागेल. स्वच्छतेचे नियम पाळावे लागतील.

 

मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त होईल. पुढील वर्षी परवानगी मिळणार नाही

 

आयोजकांना अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

 

दसरा मेळाव्याची जाहिरात, बॅनर लावण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक

 

मैदानावर स्वयंपाक करणे, चूल पेटवणे आणि अग्नी वापरास सक्त मनाई

 

रस्ता, फुटपाथवर अतिक्रमण करता येणार नाही.

 

स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार