जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वर चष्मा

राज्यातील सांगली (Sangli) आणि सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे, अनेकांना आज आपला अर्ज माघारी घेतला असून सांगली जिल्हा बँकेत काही जागांवर निवडणूक (Election) होणार आहे. काही जागांवर बिनविरोध निवडी पार पडल्या असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी माघार घेतली. मात्र, येथील निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळाला. शिंदेच्या शिवसेनेतील तीन नेते बिनविरोध संचालक बनले आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांनी (Jayant Patil) फोन करुन निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आग्रह केला होता.

 

सांगली जिल्हा बँकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी देखील माघार घेतली. तसेच, माजी आमदार सुमनताई पाटील यांचा महिला गटातून अर्ज माघारी घेण्यात आला असून सोसायटी गटातील अर्ज कायम आहे. तर, देवराज पाटील यांची पतसंस्था गटातून माघार, मात्र सोसायटी गटातील अर्ज कायम आहे. तसेच, आर.आर. पाटील यांचे भाऊ सुरेश पाटील यांचाही अर्ज माघारी घेण्यात आला आहे.

 

एकनाथ शिंदेंची तीन संचालक बिनविरोध

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेचा वरचष्मा राहिल्याचे दिसून आले. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील तीन नेत्यांची जिल्हा बँकेत संचालकपदावर बिनविरोध निवड झाली. सांगली जिल्हा बँकेसाठी विटामधून अमोल बाबर, आटपाडी मधून तानाजी पाटील, तर दिघंचीमधून नितीन होनराव यांची बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर शिंदे सेनेच्या या तिन्ही संचालकांचा जयंत पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

 

मुख्यमंत्र्‍यांचा फोन आला

बँकेत पक्षीय राजकारण नको ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. काँग्रेस, भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी हीच भूमिका घेत बहुतांश जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यात येत आहे. परवा मुख्यमंत्री यांचा फोन आला होता, बँकेची निवडणूक बिनविरोध करावी असा त्यांचा आग्रह होता, त्यानुसार आम्ही बहुतांश जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, जिल्हा बँकेमध्ये झालेल्या हा समाझोता, त्याचा पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमध्ये काही संबंध असणार नाही, असे स्पष्टीकरण देखील जयंत पाटील यांनी दिले.

 

सातारा जिल्हा बँक निवडणूक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 21 जागा यापैकी 12 जागा बिनविरोध तर 9 जागांवर निवडणूक होणार आहे. 10 वर्षांच्या निकषामुळे जिल्हा बँकेतून दिग्गजांनी अर्ज माघारी घेतले. खा. उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे यांचे अर्ज माघारी घेण्यात आले. तसेच, न्यायालयाने अपात्र ठरवलेले अनिल देसाई आणि राजेंद्र राजपुरे यांचेही अर्ज माघारी.

 

बिनविरोध झालेले उमेदवार

मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे,माजी खा.रणजीत नाईक निंबाळकर, नंदकुमार मोरे, अनिरुद्ध गाढवे, सत्यजित वीर, सर्जेराव सावंत, चंद्रकांत जाधव,डॉ अतुल भोसले, काका धुमाळ