शाळा Online की Offline? शिक्षण विभागाचा अंतिम निर्णय जाहीर; विद्यार्थी-पालकांच्या मनातला मोठा संभ्रम अखेर दूर!

राज्यातील शाळा नेमक्या ऑनलाइन सुरू होणार की ऑफलाइन, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम होता. वाढती उष्णता, विदर्भातील उष्णतेची लाट आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे शाळा उशिरा सुरू होणार किंवा ऑनलाइन भरवण्यात येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

 

मात्र शिक्षण विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 

15 जूनलाच नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

 

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2026 पासूनच सुरू होणार आहे. शाळा उशिरा सुरू करण्याचा किंवा तारीख पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमित वेळापत्रकानुसार शाळेच्या तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ऑनलाइन शिक्षणाचा सध्या कोणताही विचार नाही

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊनच शिक्षण घ्यावे लागणार असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. सध्यातरी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे कोणतेही नियोजन शासनाच्या स्तरावर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

विदर्भातील शाळांसाठी विशेष वेळापत्रक

 

विदर्भात यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 15 जून ते 29 जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या प्रखर उन्हाचा सामना करावा लागणार नाही. 30 जूनपासून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.

 

अफवांमुळे निर्माण झाला होता गोंधळ

 

काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे शाळा 15 जूनऐवजी 26 जूनपासून सुरू करण्याचा विचार सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र शिक्षण विभागाने अधिकृत आदेश कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. शाळा नियोजित तारखेलाच सुरू होतील आणि कोणताही बदल झालेला नाही, असे विभागाने सांगितले आहे.

 

पालक आणि विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे?

 

नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि इतर तयारी वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. शाळा ऑफलाइन सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थिती, अभ्यासाची तयारी आणि वेळेचे नियोजन याकडे विशेष लक्ष द्यावे. अधिकृत माहिती फक्त शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेकडूनच घ्यावी आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.