देशात सध्या बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातही तरुण वर्गामध्ये ही संख्या मोठी आहे. ज्यामुळे बेरोजगार तरुणाई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करत आहेत.
मात्र आता काळजी नसावी कारण सुशिक्षित बेरोजगारांसाठी बँकिंग क्षेत्रात मेगाभरतीची घोषणा झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसमार्फत तब्बल 11 हजार 403 लिपिक पदांसाठी मेगाभरती काढण्यात आली आहे. त्यामुळे बँकेत नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. त्यातही महाराष्ट्रात 1000 पेक्षा अधिक भरती होणार असून कस्टमर सर्व्हिस असोसिएट अर्थातच लिपिक पदासाठी ही मेगाभरती होणार आहे.
बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक या बँकांमध्ये देशभरातील ब्रांचेसमध्येही भरती प्रक्रिया होणार आहे. https://ibps.in/ या साइटवर Recent Updates मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती, फॉर्म कसा भरायचा, वयोमर्यादा, कोणत्या राज्यात किती पदे अशी सर्व माहिती या साइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शनिवार 1 ऑगस्टपासून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून 21 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
उमेदवारांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. आयबीपीएस क्लर्क भरती 3026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विविध सार्वजनिक बँकांमध्ये स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहणार असून, प्रीलिम्स, मेन्स आणि दस्तऐवज पडताळणी अशा टप्प्यांत निवड होईल. याकरिता उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय संगणक साक्षरता अनिवार्य आहे. उमेदवाराने संगणक विषयात प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी घेतलेली असावी किंवा हायस्कूल/कॉलेज स्तरावर संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हा विषय असावा. वयाची किमान मर्यादा 20 वर्षे आणि कमाल मर्यादा 28 वर्षे आहे.
SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क 850 रूपये आहे, तर SC, ST आणि PwD उमेदवारांना फक्त 175 रुपये शुल्क लागू आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि चांगल्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही आयबीपीएस क्लर्क भरती खरोखरच एक मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट नियमित तपासून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.