बँकेमध्ये नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. त्यातही स्टेट बँकेमध्ये नोकरी मिळाल्यास सर्वांनाच आनंद होतो. अनेक वर्षानंतर एसबीआयमध्ये नोकरीची संधी चालून आलेली आहे. तब्बल दीड हजार जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून भारतात कुठेही नियुक्ती मिळू शकते.
कुठल्याही शाखेतील पदवीधरांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष २०२६-२७ साठी प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीची अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. देशभरातील पात्र पदवीधरांसाठी एकूण १,५०० रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १८ जून रोजी सुरू झाली असून ८ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
तीन पातळीवर परीक्षा
या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतामध्ये कुठेही केली जाऊ शकते. अधिकृत अधिसूचनेनुसार, ही निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे, ज्यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार एसबीआयच्या करिअर पोर्टलवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरणे: १८ जून ते ८ जुलै २०२६
पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र: जुलै २०२६ चा दुसरा/तिसरा आठवडा
पूर्व परीक्षा: ऑगस्ट २०२६
पूर्व परीक्षेचा निकाल: ऑगस्ट/सप्टेंबर २०२६
मुख्य परीक्षा: सप्टेंबर २०२६
सायकॉमेट्रिक टेस्ट, ग्रुप चर्चा आणि मुलाखत: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२६
अंतिम निकाल: नोव्हेंबर/डिसेंबर २०२६
पात्रता आणि वयोमर्यादा
अर्जदार उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी देखील अटींच्या अधीन राहून तात्पुरता अर्ज करू शकतात. दरम्यान, १ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित प्रवर्गांच्या जागांसह एकूण १,५०० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम स्टेट बँकेच्या sbi.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होमपेजवर दिलेल्या ‘SBI PO Recruitment 2026’ या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नवीन नोंदणी करा.
नोंदणी झाल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक पूर्ण भरा.
आवश्यक कागदपत्रे, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
उपलब्ध ऑनलाईन माध्यमांद्वारे अर्ज शुल्क भरा.
फॉर्म पूर्ण सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.