“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लालपरी यंदाही सज्ज झाली आहे.
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी तब्बल ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वेने किंवा खासगी वाहनांनी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या सर्व भाविकांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाने हे व्यापक नियोजन केले असून, भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एसटी महामंडळाने वारकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवल्या आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजने’अंतर्गत पूर्णपणे मोफत प्रवास करता येईल, तर महिला प्रवाशांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत नेहमीप्रमाणे तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विठूरायाच्या दर्शनाचा प्रवास अधिक किफायतशीर आणि सुलभ होणार आहे. मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार २०० विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याहून अधिक सक्षम नियोजन करण्यात आले आहे.
वारीच्या काळात पंढरपूर शहरात होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनातर्फे चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या सर्व तात्पुरत्या बस स्थानकांवर पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, २४ तास कार्यरत असणारा चौकशी कक्ष आणि भाविकांच्या सोयीसाठी मार्गदर्शन फलक यांसारख्या सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक एकाच वेळी परतीच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे पंढरपूर आणि परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक हे स्थानिक पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून २४ तास रस्त्यावर कार्यरत राहणार आहेत. यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी होऊन भाविकांचा परतीचा प्रवास विनाअडथळा पूर्ण होण्यास मदत लाभणार आहे.