केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई मदतीत (DR) वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. 14 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती
मात्र या बैठकीत DA वाढीबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं लक्ष आता सरकारच्या पुढील घोषणेकडे लागलं आहे.
दिवाळीचा सण जवळ आल्याने सरकार सणापूर्वी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करेल, अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान याच बैठकीत पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा Productivity Linked Bonus देण्यास मंजुरी देण्यात आलीये. तसंच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीये. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी DA वाढीची भेट मिळणार का आणि महागाई भत्ता किती वाढू शकतो, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
DA वाढीच्या घोषणेला उशीर का?
केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात बदल करते. पहिली वाढ जानेवारीपासून, तर दुसरी वाढ जुलैपासून लागू केली जाते. जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा साधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात केली जाते. तर जुलैपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सहसा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होते.
याआधी सरकारने महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के केला होता. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू मानण्यात आली. याबाबत सरकारने 22 एप्रिल 2026 रोजी अधिकृत आदेश जारी केला होता. आता जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या नव्या दराची घोषणा होणं बाकी आहे. सरकारकडून अधिकृत आदेश जारी झाल्यानंतरच नवीन दर निश्चित झाल्याचं मानता येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सध्या सरकारच्या घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
महागाई भत्ता कसा ठरवला जातो?
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ करायची, हे ठरवताना महागाईची आकडेवारी पाहिली जाते. यासाठी औद्योगिक कामगारांसाठी असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाचा (AICPI-IW) आधार घेतला जातो. ऑगस्ट 2026 मध्ये हा निर्देशांक 1.2 अंकांनी वाढून 154.4 वर पोहोचला. तसंच ऑगस्ट 2025 मध्ये 3.16 टक्के असलेला वार्षिक महागाई दर ऑगस्ट 2026 मध्ये वाढून 4.96 टक्के झाला.
या आकडेवारीवरून बाजारातील महागाईची स्थिती समजण्यास मदत होते. मात्र केवळ या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्त्याचा नवा दर निश्चित झालाय असं म्हणता येणार नाही. DA किती वाढणार याची अंतिम माहिती सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी प्रतीक्षा
जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात आणि महागाई मदतीत वाढ होण्यासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. सरकारने अद्याप नवीन दर, थकबाकीची रक्कम (एरियर) आणि वाढीव रक्कम कधीपासून मिळणार, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
महागाई भत्ता वाढण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दिवाळीपूर्वी सरकार याबाबत घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र नवीन दर किती असेल आणि थकबाकी कधी मिळेल, याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सरकारच्या अधिकृत आदेशाची वाट पाहणं महत्त्वाचं आहे.