वाढत्या पेट्रोल खर्चाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी Hero MotoCorp ने भारतीय बाजारात एच एफ डिलक्स फ्युएल फ्लेक्स ही नवी बाईक लॉन्च केली आहे. E85 इंधनावर चालणारी ही देशातील सर्वात परवडणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल मोटारसायकलींपैकी एक मानली जात आहे.
आकर्षक रंगसंगती, सुधारित इंजिन तंत्रज्ञान आणि आधुनिक फीचर्ससह आलेली ही बाईक आता ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Hero HF Deluxe Flex Fuel ची किंमत किती?
Hero HF Deluxe Flex Fuel ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹72,792 ठेवण्यात आली आहे. ही किंमत बेस HF Deluxe मॉडेलपेक्षा ₹13,315 अधिक आहे. तसेच HF Deluxe Pro व्हेरिएंटपेक्षा ही बाईक केवळ ₹172 महाग आहे.
मुंबईमधील या बाईकची ऑन-रोड किंमत 87,566 रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत RTO शुल्क आणि विम्याचा समावेश करण्यात आला आहे.
Hero HF Deluxe Flex Fuel साठी EMI किती येणार?
Hero HF Deluxe Flex Fuel साठी ग्राहकांना फायनान्सची सुविधाही उपलब्ध आहे. 11,000 रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर 36 महिन्यांच्या कालावधीसाठी 10% व्याजदराने EMI सुमारे 2,765 रुपये प्रति महिना येतो. तुम्हाला कमी व्याजदरात लोन मिळाले तर इएमआय आणखी कमी होऊ शकतो. व्याजदर तुमच्या सीबील स्कोअरवर अवलंबून असेल.
Hero HF Deluxe चे E85 इंधनावर चालणारे इंजिन
या बाईकमध्ये 97.2cc क्षमतेचे एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.4 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क निर्माण करते. विशेष म्हणजे हे इंजिन E85 इंधनाशी सुसंगत आहे. E85 म्हणजे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल यांचे मिश्रण.
E20 अनुरूप HF Deluxe च्या तुलनेत या बाईकमध्ये पॉवर आणि टॉर्क दोन्हीमध्ये किंचित वाढ करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने ECU मध्ये बदल करून इंधन प्रणालीतील विविध घटक अपग्रेड केले आहेत.
काय आहे E85 फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान?
फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानामुळे वाहन विविध प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकते. यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होते, कार्बन उत्सर्जन घटते आणि देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाला चालना मिळते. सरकारही अशा वाहनांना प्रोत्साहन देत आहे.
आकर्षक डिझाइन आणि नवीन रंगसंगती
HF Deluxe Flex Fuel ला इतर व्हेरिएंट्सपेक्षा वेगळी ओळख मिळावी यासाठी कंपनीने ब्लॅक रंगासोबत लाइम यलो ग्राफिक्स दिले आहेत. ही रंगसंगती बाईकला अधिक स्पोर्टी आणि फ्रेश लुक देते.
Hero HF Deluxe Flex Fuel ची फीचर्स
या नवीन मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात ट्विन-पॉड सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अॅनालॉग स्पीडोमीटर, डिजिटल फ्युएल गेज, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ फीचर, किक आणि सेल्फ स्टार्ट, ट्युबलेस टायर्स आणि 18-इंच अलॉय व्हील्स ही सर्व फीचर्स आहेत. रोजच्या वापरात ही फीचर्स अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव देतात.
Hero HF Deluxe Flex Fuel चे सस्पेन्शन आणि ब्रेकिंग सिस्टम
टेक्निकली या बाईकमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क, मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स, पुढे आणि मागे ड्रम ब्रेक्स आणि ट्युबलेस टायर्ससह 18-इंच चाके देण्यात आले आहेत. हे सेटअप शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी योग्य मानले जाते.
Hero HF Deluxe Flex Fuel चे मायलेज किती?
कंपनीने अधिकृत मायलेजचा तपशील जाहीर केलेला नसला तरी HF Deluxe मालिकेची इंधन कार्यक्षमता लक्षात घेता ही बाईकही उत्कृष्ट मायलेज देण्याची अपेक्षा आहे. E85 इंधनावर चालण्याची क्षमता असल्यामुळे दीर्घकालीन इंधन खर्चात बचत होऊ शकते.