निवृत्तीनंतर नियमित आणि सुरक्षित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध बचत योजना राबवते. त्यापैकी सिनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) ही सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाते.
या योजनेत सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याजदर मिळत असून, प्रत्येक तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते. नियमित उत्पन्न आणि भांडवलाची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींचा विचार करता, निवृत्त व्यक्तींसाठी ही योजना आकर्षक पर्याय ठरत आहे.
५ वर्षांत खाते मॅच्युअर होणार
सिनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीमअंतर्गत एकरकमी गुंतवणूक करावी लागते, तर उघडलेले खाते ५ वर्षांनंतर मॅच्युअर होते. या योजनेत किमान १,००० रुपये आणि कमाल ३०,००,००० रुपये गुंतवता येतात. खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. मात्र, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना ५५ ते ६० वर्षे वयोगटातही या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना ५० ते ६० वर्षे वयोगटात खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
किती गुंतवणूक आवश्यक?
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेतून दरमहा सुमारे २०,००० रुपयांचे निश्चित उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी अंदाजे २९,३०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या रकमेवर सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार प्रत्येक तीन महिन्यांनी सुमारे ६०,०६४ रुपये व्याज मिळेल. याचा विचार केल्यास, दरमहा सरासरी २०,०२१ रुपये उत्पन्न मिळू शकते. अशा प्रकारे गुंतवणूकदाराला पुढील ५ वर्षे प्रत्येक तिमाहीत व्याजाचा लाभ मिळत राहतो.
मॅच्युरिटीनंतर आणखी ३ वर्षे मुदतवाढीची सुविधा
या योजनेचा ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला ती योजना आणखी ३ वर्षांसाठी वाढवण्याची सुविधा दिली जाते. ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे गुंतवणूकदाराच्या भांडवलाला उच्च पातळीची सुरक्षितता मिळते. त्यामुळे आर्थिक जोखीम अत्यंत कमी मानली जाते.
खाते कुठे उघडता येते?
सिनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीमचे खाते देशातील प्रमुख सरकारी बँकांमध्ये उघडता येते. याशिवाय जवळच्या टपाल कार्यालयात (पोस्ट ऑफिस) देखील SCSS खाते सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आहे.