स्वाभिमान निधी योजना: लाडकी बहीण योजनेप्रमाणे महिलांना मिळणार दरमहा 2000 रुपये?

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि सरकारच्या अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात.

 

ही योजना अनेकांना माहीत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ‘स्वाभिमान निधी योजना’ नावाची नवीन योजना येण्याची शक्यता आहे. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० ते २००० रुपये मिळू शकतात.

 

स्वाभिमान निधी योजना काय आहे?

 

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या नोकरदार वर्गाच्या घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विशेष आर्थिक मदत योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. माजी महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना एक अधिकृत पत्र लिहून ‘स्वाभिमान निधी’ सुरू करण्याची विनंती केली आहे.

 

सन २०२६-२०२७ च्या आगामी अर्थसंकल्पामध्ये या नवीन योजनेचा समावेश करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात या योजनेचा समावेश झाला तर मुंबईसह उपनगरातील घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० ते २०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

 

किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पत्रात मुंबईतील नोकरदार वर्ग आणि घरकाम करणाऱ्या महिलांच्या परिस्थितीचे सविस्तर वर्णन केले आहे. मुंबईत अनेक घरांमध्ये साफसफाई, कपडे, धुणी-भांडी, जेवण बनवणे आणि लहान मुलांना सांभाळण्यासाठी मोलकरीण किंवा घरकाम करणाऱ्या महिलांची मदत घेतली जाते.

 

या महिला स्वतःच्या घरची सर्व कामे आटपून इतरांच्या घरी कष्टाची कामे करतात. मात्र, त्यांना मिळणारे वेतन अत्यंत कमी असते. इतक्या कमी मानधनात स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे त्यांना अत्यंत कठीण जाते. काही महिला तर वृद्धत्वामुळे किंवा आजारी असतानाही केवळ कुटुंबाच्या जबाबदारीपोटी नाईलाजास्तव कामावर जातात.

 

महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू करून प्रतिमहिना १५०० ते २००० रुपयांचे अर्थसाहाय्य दिले आहे, त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाली तर मुंबईतील कामगार महिलांना दरमहा १५०० ते २००० रुपये मिळू शकतात.