लाडक्या बहिणीं’ना दे धक्का! तब्बल 92 लाख नावं वगळली, सर्वाधिक आकडा ‘या’ जिल्ह्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ राज्यात असंख्य महिला घेत आहेत. तर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा मोठा फायदा देखील सरकारला झाला. आता याच योजनेबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. सुरुवातीला 80 लाख महिलांची नावं कमी होतील असा अंदाज सरकारने वर्तवलेला, पण आता थेट 92 लाख बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.

 

सर्वाधिक आकडा कोणत्या जिल्ह्याचा?

अनेक जिल्ह्यांमधून लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आली आहे. पण यामध्ये बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या फार मोठी आहे. एकट्या बीड मधून तब्बल 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहे. पण ज्या महिलांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आली आहेत, त्यांच्या तक्रारींची दखल घेत चौकशी होईल… असं देखील सरकारकडून सांगण्यात येत आहे.

 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी महिला का ठरत आहेत अपात्र?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू झाल्यानंतर पारदर्शकता ठेवण्यासाठी काही बदल करण्यात आले आणि काही महत्त्वाच्या प्रक्रिया पार पडण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण ज्या महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. ज्या महिला ई – केव्हायसी पूर्ण करू शकल्या नाहीत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. तर योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा निकष लाभार्थी महिलांनी पाळलं नसल्याचं देखील समोर आले.

 

एवढंच नाही तर, तब्बल 12 लाख महिलांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. तर 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय हे 65 वर्षांपूढे असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. पण चौकशी नंतर अपात्र असलेल्यांची नावे योजतून वगळण्यात आली आहेत. यादीत तब्बल 14 हजार पुरुषांची नावे असल्याची माहिती समोर येत असून छाननीत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.