राज्यातील महामंडळाचे महिन्याभरात वाटप, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची सूचना, महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील महायुती सरकारकडून लवकरच बहुप्रतिक्षीत महामंडळ वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून महायुतीमधील (Mahayuti) अनेक नेते आणि पदाधिकारी हे महामंडळांच्या (Mahamandal) वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत.

 

अखेर महामंडळांचे वाटप (Corporation Allocation) करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या महायुतीचे नेते आणि पदाधिकारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. (Maharashtra Politics news)

 

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात राज्यातील महामंडळाचे जागावाटप पूर्ण होईल. महामंडळ वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार, भाजपा 48 टक्के, शिवसेना (Shivsena) 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 20 टक्के महामंडळ, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. येत्या महिनाभरात यावर शिक्कामोर्तब होईल. महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. यानंतर तिन्ही पक्षांचे नेते कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची हा निर्णय घेतील. त्यासाठी महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील महामंडळाची सूत्रे कोणत्या नेत्यांकडे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात राजकीय हालचाली सुरु आहेत. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने विधान परिषदेच्या किती आणि कोणत्या जागा कोण लढवणार, याबाबत सध्या महायुतीत बोलणी सुरु आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास 18 जून रोजी सगळी धामधूम संपेल. मतदान झाल्यास 22 जूनपर्यंत राजकीय डाव-प्रतिडाव आणि चुरस पाहायला मिळेल. त्यानंतर महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून आतापासून महामंडळांवर आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु होईल. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या राजकीय घडामोडींकडे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.