राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून येत्या ३० जुलैआधी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा होता. सरकारकडून देखील कर्जमाफीसंदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. अशामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली. त्यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार आहे. उद्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहेत.’
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘कुठलंही आंदोलन असले की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात. ते आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
तंसच, ‘दिल्लीतील आंदोलन हे चेहराहीन होते त्यामुळे ते भरकटलं आहे. आंदोलकांनी पोलिसांची वाहनं फोडली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. पोलिसांनी वेळीच सगळं कंट्रोल केलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. मी सगळ्या आंदोलनावर आरोप करत नाही पण काही लोक चांगल्या भावनेनेही आंदोलनं करत असतील. पण काही लोकांना अराजकता माजवण्याचा हेतू असतो.’, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.