SBI RD की, पोस्ट ऑफिस RD? कुठे गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल? जाणून घ्या…

सुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी रिकरिंग डिपॉझिट (RD) हा लोकप्रिय पर्याय आहे. म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजाराप्रमाणे बाजारातील चढ-उतारांचा RD वर परिणाम होत नसल्याने अनेक गुंतवणूकदार या योजनेला प्राधान्य देतात.

 

मात्र, पोस्ट ऑफिस RD आणि स्टेट बँक ऑफ इंडिया RD, यापैकी कोणता पर्याय निवडावा, या संभ्रमानत अनेकजण असतात. या दोन्ही पर्यायांबद्दल जाणून घेऊ…

 

जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा ₹१०,००० इतकी रक्कम सलग ५ वर्षे जमा केली, तर पोस्ट ऑफिस RD आणि SBI RD, या दोन्ही योजनांमधून चांगला निधी उभारता येऊ शकतो. मात्र, व्याजदरांतील फरकामुळे मुदतपूर्तीच्या वेळी मिळणाऱ्या रकमेतील तफावत लक्षवेधी आहे.

 

पोस्ट ऑफिस RD विरुद्ध SBI RD

 

तपशील Post Office RD SBI RD

व्याजदर (वार्षिक) ६.७% ६.०५%

मासिक गुंतवणूक ₹ १०,००० ₹ १०,०००

कालावधी ५ वर्षे ५ वर्षे

एकूण गुंतवणूक ₹ ६,००,००० ₹ ६,००,०००

अंदाजित मॅच्युरिटी रक्कम ₹ ७,१३,६५९ ₹ ७,००,५५७

एकूण मिळणारे व्याज ₹ १,१३,६५९ ₹ १,०१,५५७

कुठे मिळेल अधिक परतावा?

 

सध्याच्या व्याजदरांनुसार, पोस्ट ऑफिस RD मध्ये दरमहा ₹१०,००० गुंतवल्यास ५ वर्षांनंतर अंदाजे ₹७.१४ लाख रक्कम मिळू शकते. तर SBI RD मध्ये हीच गुंतवणूक केल्यास सुमारे ₹७.०२ लाख मिळण्याची शक्यता आहे.

 

यामुळे पोस्ट ऑफिस RD निवडणाऱ्या गुंतवणूकदाराला SBI RD च्या तुलनेत जवळपास ₹१२,१०० अधिक परतावा मिळू शकतो. मात्र, ही गणना सध्याच्या व्याजदरांवर आधारित असून भविष्यात व्याजदरांमध्ये बदल झाल्यास परताव्याच्या रकमेतही बदल होऊ शकतो.

 

RD खाते म्हणजे काय?

 

रिकरिंग डिपॉझिट (RD) ही अशी बचत योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम जमा करतो. ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर जमा केलेली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज एकत्रित स्वरूपात परत मिळते. नियमित बचतीची सवय लावण्यासाठी RD हा प्रभावी पर्याय मानला जातो.

 

पोस्ट ऑफिस RD ची वैशिष्ट्ये

 

केवळ ₹१०० प्रतिमहिना इतक्या रकमेपासून खाते सुरू करता येते.

गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.

खात्याचा कालावधी ५ वर्षांचा असतो.

आवश्यक असल्यास ३ वर्षांनंतर खाते बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मात्र, मुदतपूर्तीपूर्वी खाते बंद केल्यास RD वरील व्याजाऐवजी बचत खात्याचा व्याजदर लागू होऊ शकतो.

SBI RD ची वैशिष्ट्ये

 

SBI मध्येही RD खाते ₹१०० मासिक गुंतवणुकीपासून सुरू करता येते.

हप्ता वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो.

सलग ६ हप्ते न भरल्यास खाते मुदतपूर्व बंद केले जाऊ शकते.

५ वर्षांपर्यंतच्या RD साठी प्रत्येक ₹१०० मासिक हप्त्यामागे ₹१.५० प्रतिमहिना दंड आकारला जाऊ शकतो.